Home Breaking News हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक!

हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक!

85
0

पुणे शहरातील हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) या घातक इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन जणांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सुमारे १९० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या असून त्यांची एकूण बाजारभावानुसार किंमत सुमारे १ लाख रुपये आहे.

दिनांक ९ मार्च २०२५ रोजी हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून ही कारवाई केली. तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, आणि पोलिस कर्मचारी दिपक कांबळे, अभिजीत राऊत, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महावीर लोंढे, चंद्रकांत रेजिवाड यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

संशयित आरोपी म्हणून योगेश सुरेश राउत (२५ वर्षे), रा. घुलेवस्ती हाईट्स, मोरेवस्ती, मांजरी बुद्रुक, हडपसर, पुणे आणि निसार चाँद शेख (२३ वर्षे), रा. १५ नं. घाडगे गल्ली, शेख चाळ, हडपसर, पुणे यांना अटक करण्यात आली आहे.

बेकायदेशीर इंजेक्शनचा साठा:-

प्रथम या दोघांकडून ६० MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP च्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर या इंजेक्शनचा वापर नशेसाठी केला जात असल्याची माहिती समोर आली. आरोपींना कोणताही औषध विक्रीचा परवाना नव्हता तसेच या इंजेक्शनच्या वापरामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात हे माहित असूनही ते विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हा दाखल:-

पोलिसांनी आरोपींविरुद्ध IPC कलम १२३, २७५, २७८, १२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेतल्यानंतर चौकशीत आणखी १३० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

एकूण साठा आणि त्याची किंमत:-

या कारवाईत एकूण १९० इंजेक्शनच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून त्यांची एकूण बाजारातील किंमत अंदाजे १ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी करीत आहेत.

सामाजिक आवाहन:-

हडपसर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात संशयित हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. अशा घातक पदार्थांचे सेवन आरोग्यास गंभीर धोका पोहोचवू शकते आणि भविष्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देऊ शकते.