मुंबई | राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी ‘दैनिक बदलता महाराष्ट्र’ ने एक सामाजिक उपक्रम म्हणून पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत, मनोज कोलते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सामाजिक जबाबदारीच्या कृतीबद्दल मनापासून आभार व्यक्त करत, समाजातील प्रत्येक घटकाने अशा संकटाच्या काळात एकत्र येण्याचे आणि हातभार लावण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “अशा उदारतेमुळे आपला महाराष्ट्र आणखी सक्षम आणि एकजुटीचा होतो.”
मनोज कोलते पाटील यांनी सांगितले की, “राज्यातील शेतकरी आणि नागरिकांवर आलेले हे संकट कमी करण्यासाठी माध्यमांची जबाबदारी केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून, समाजकारणात सहभाग घेण्याचीही आहे. ‘दैनिक बदलता महाराष्ट्र’ या तत्त्वावर काम करत राहील.”
या प्रसंगी उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा संकल्प केला. सामाजिक एकोपा आणि सहकार्याचा हा सुंदर संदेश महाराष्ट्रभर पोहोचला आहे.