मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या लढ्याला आता नवी दिशा मिळाली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे धडक मोर्चा सुरू केला असून, २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आरक्षणासाठी भव्य आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. सध्या ते शिवनेरी येथे दाखल झाले असून उद्या सकाळी ते मुंबईत दाखल होणार आहेत.
सरकारकडून केवळ एका दिवसाची परवानगी या आंदोलनासाठी देण्यात आली असून सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेतच आंदोलनाची मुभा आहे. तसेच फक्त ५ हजार आंदोलकांनाच आझाद मैदानावर उपस्थित राहण्याची अट मुंबई पोलिसांनी स्पष्ट केली आहे. तरीदेखील महाराष्ट्रातील विविध भागांतून मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे निघाले असून, आझाद मैदान परिसरात आधीच गर्दी वाढू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आझाद मैदानाला छावणीचे स्वरूप दिले आहे. सकाळपासूनच शेकडो पोलीस अधिकारी आणि जवान तैनात करण्यात आले आहेत. रॅपिड अॅक्शन फोर्स, क्यूआरटी, ट्रॅफिक पोलीस यांसह संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
मोर्चा सुरू करण्यापूर्वीच मनोज जरांगे यांनी पोलिसांना हमीपत्र दिले आहे. यात त्यांनी आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही, वाहतुकीत अडथळा येणार नाही आणि सर्व कायदेशीर निर्देशांचे पालन केले जाईल अशी खात्री दिली आहे.
हमीपत्रातील महत्त्वाचे मुद्दे :
आंदोलन परवानगीच्या अटींनुसारच पार पडेल.
पोलिसांशी संपर्कासाठी जबाबदार व्यक्ती नियुक्त केली जाईल.
सभास्थळी पाणी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
सहभागींची संख्या निश्चित मर्यादेतच राहील.
स्वयंसेवक तैनात केले जातील आणि त्यांची यादी पोलिसांकडे दिली जाईल.
ध्वज/फलकांच्या आकारावर मर्यादा पाळली जाईल.
कोणतेही धोकादायक साहित्य, चिथावणीखोर भाषा किंवा धार्मिक द्वेष पसरवणारे कृत्य होणार नाही.








