Home Breaking News पुणेकरांच्या खिशाला मोठा फटका! PMPML बसच्या तिकिटात तब्बल दुप्पट वाढ – नवीन...

पुणेकरांच्या खिशाला मोठा फटका! PMPML बसच्या तिकिटात तब्बल दुप्पट वाढ – नवीन दर, टप्प्यांची रचना आणि प्रवाशांवरील परिणाम जाणून घ्या

164
0

पुणे :- पुणे व पिंपरी-चिंचवडमधील लाखो प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने तब्बल ११ वर्षांनंतर बसच्या तिकिट दरात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ २०१४ नंतर प्रथमच होत असून, त्यामुळे दररोज PMPML बसने प्रवास करणाऱ्या सुमारे १२ लाख प्रवाशांच्या खिशावर मोठा भार येणार आहे.


१० रुपयांपासून सुरुवात – नव्या टप्प्यांची रचना

नवीन दररचनेनुसार, सुरुवातीचं तिकीट आता १० रुपयांपासून सुरू होणार आहे, जे यापूर्वी ५ रुपये होते. दोन किलोमीटरऐवजी आता प्रत्येक टप्पा पाच किलोमीटरचा असेल, यामुळे काही प्रमाणात लांब पल्ल्याच्या प्रवाशांना दिलासा मिळणार असला तरी, दैनंदिन प्रवाशांना हा मोठा आर्थिक फटका ठरणार आहे.

 एकूण ११ टप्पे, लांब प्रवासासाठी वेगळी दररचना

१ ते ३० किमी अंतरासाठी: प्रत्येक ५ किमी साठी ६ टप्पे

३० ते ८० किमी अंतरासाठी: प्रत्येक १० किमी साठी ५ टप्पे

एकूण टप्पे: ११

पिंपरी-चिंचवड हद्दीतील दैनंदिन पास: ४० रुपयांवरून आता ७० रुपये

PMRDA हद्दीत दैनंदिन पास: १२० वरून १५० रुपये

PMRDA मासिक पास: ९०० वरून १५०० रुपये

 सवलती मात्र कायम

नवीन दररचनेनुसार विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी सवलतीचे दर मात्र पूर्ववत ठेवले गेले आहेत. त्यामुळे या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच PMRDA हद्दीतील मासिक पासचा दरही तसाच ठेवण्यात आला आहे.

 तिकीट मशीनमध्ये बदल – अंमलबजावणी लवकरच

पीएमपीने सांगितले की, तिकीट मशीन व प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्यात येत आहेत, त्यानंतर पुढील १५ दिवसांत नवीन दर लागू करण्यात येतील. PMPML ने २० डिसेंबर २०१४ नंतर पहिल्यांदाच दरवाढ केली आहे.

 खर्च वाढल्यामुळे निर्णय आवश्यक – PMPML

या दरवाढीमागे कारण दिले गेले आहे की, डिझेल, CNG, बस देखभाल आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च झपाट्याने वाढलेला आहे. त्यामुळे आर्थिक ताळमेळ राखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला आहे.

 कर्मचाऱ्यांच्या भरतीत बदल

बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला – नवे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे, जेणेकरून वेतन खर्चावर नियंत्रण मिळवता येईल.