धुळे-पुणे गांजा तस्करीचा पर्दाफाश; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई
पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गांजा तस्करीचा मोठा पर्दाफाश केला आहे. धुळे येथून कारने विक्रीसाठी पुण्यात आलेल्या तस्कराला पकडून त्याच्याकडून ५५ किलो गांजासह तब्बल ३२ लाखांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आळंदी-घाट परिसरात रात्री तपासणी दरम्यान केली.
गांजाची विक्री करण्यासाठी वापरली कार, पोलिसांची दक्षता महत्त्वाची ठरली
पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे यांच्या नेतृत्वाखालील सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व त्यांच्या पथकाने रात्री संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार भरधाव जाताना दिसली. संशय आल्याने गाडी थांबवून चौकशी केली असता, तस्कराने उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडीच्या डिकीची तपासणी केली असता एका पोत्यामध्ये ५५ किलो गांजा आढळून आला.
गांजाच्या तस्करीसाठी नाशिकच्या तस्कराचा वापर
नुरमोहम्मद गफ्फार पिंजारी (वय ४५, रा. वडाला गाव, मदिना नगर, नाशिक) असे या आरोपीचे नाव आहे. तो धुळे, मध्य प्रदेश येथून गांजा आणून पुण्यात विक्रीसाठी पाठवण्याचे काम करत होता. त्याच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून ३२ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा गांजा, मारुती कार व दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिसांची तिसरी यशस्वी कारवाई
धुळे व मध्य प्रदेशमधून गांजाची तस्करी करणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी याआधीही कारवाई केली आहे. रिक्षा व एसटी बसमधून तस्करी करणाऱ्यांनाही यापूर्वी पकडण्यात आले आहे. पोलिसांनी गांजा तस्करी थांबवण्यासाठी कठोर पावले उचलत ही मोहिम आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
पोलीस आयुक्तांचा स्पष्ट आदेश: अंमली पदार्थ मुक्त पुणे
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देत आहेत. सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, आणि पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारवाई करणाऱ्या पोलिसांचे कौतुक
या यशस्वी मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व त्यांच्या पथकातील विजय दौंडकर, गणेश कर्पे, मयुर वाडकर, निखिल शेटे, रणधीर माने, प्रकाश ननावरे व इतर सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.