पुणे जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्रीवर कठोर पावले उचलली आहेत. १ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान अवैध दारू विक्रीशी संबंधित एकूण ९२३ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, या कारवाईत ८४३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या अवैध दारूचे मूल्य सुमारे ३.५१ कोटी रुपये असून, ९६ वाहने आणि गोव्यातील बंदी घालण्यात आलेली दारू देखील जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेत मतदारांवर अवैध दारूचा प्रभाव पडू नये म्हणून हा व्यापक मोहीम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र मद्यबंदी कायदा, १९४९ अंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर दारूची विक्री रोखली जाऊ शकते.
कारवाईमध्ये कायदे पाळण्यासाठी कठोर नियमावली
ही मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, पुणे जिल्हा अधीक्षक चरणसिंग राजपूत, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे आणि सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. यानुसार, पुणे जिल्ह्यात १८ तात्पुरती तपासणी नाके स्थापन करण्यात आले असून, संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
लायसन्स असलेल्या दारू विक्री दुकानांवर देखील कठोर नजर ठेवली जात आहे. दुकानांच्या वेळांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, विशेषतः अल्पवयीन व्यक्तींना दारू विक्री न करण्याची दक्षता घेण्यात आली आहे. अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक किंवा वितरणाच्या तक्रारींसाठी नागरिकांनी टोल-फ्री क्रमांक १८००२३३९९९९९ आणि अधीक्षक कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर ०२० २६१२७३२१ संपर्क साधावा.
मतदानाच्या दिवसात ‘ड्राय डे’
मतदानाच्या दिवसात जिल्ह्यात दारूविक्रीवर निर्बंध घालण्यात आले असून, १८ नोव्हेंबर संध्याकाळी ६ वाजल्यापासून २० नोव्हेंबर मतदानाच्या समाप्तीपर्यंत आणि २३ नोव्हेंबर मतमोजणीच्या दिवशी ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीस आळा बसेल आणि मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दारूचा प्रभाव पडणार नाही याची खात्री होईल.