पुणे: माजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक वानराज आंदेकर यांची रविवारी रात्री नाना पेठ येथील डोके तालीम परिसरात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. घटनास्थळी हल्लेखोरांनी धारदार शस्त्रं आणि पिस्तुलांसह आंदेकर यांच्यावर अचानक हल्ला केला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हल्ल्याच्या वेळी आंदेकर एकटेच होते, आणि त्यांच्यावर 10-15 आरोपींनी हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यापूर्वी परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता.
आंदेकर यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला कुटुंबातील वाद किंवा जुन्या वैमनस्यातून झाल्याची शक्यता आहे. सध्या पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
या निर्घृण हत्याकांडाने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांत अस्वस्थता पसरली आहे.
या घटनेने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.