पुणे: पुण्यातील एसटी बस स्थानकात (भोर एसटी स्टँड) झालेल्या एका धक्कादायक घटनेत, एक तरुण बसखाली चिरडल्याने मृत्यूमुखी पडला आहे. या घटनेचा सीसीटीव्हीत कैद व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मृत तरुणाचे नाव रूपेश गायकवाड असे आहे. ही घटना सोमवार दुपारी घडली.
माहितीनुसार, रूपेश गायकवाड बसच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात असताना अचानक बसचालकाने बस पुढे घेतली. यावेळी बसच्या चाकाखाली चिरडल्याने रूपेशचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रूपेशला त्याच्या पायाच्या दुखापतीमुळे लंगडत चालताना दिसत आहे. पायाच्या दुखापतीमुळे तो वेदनेत होता आणि त्यामुळे हळू चालत एसटीजवळ थांबला. रूपेश थांबताच एसटी चालकाने बस पुढे घेतली. पायाच्या दुखापतीमुळे रूपेश वेगाने हलू शकला नाही आणि बसखाली चिरडला गेला.
शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला, घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह भोर उपविभागीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पुढील तपास भोर पोलीस करत आहेत. या घटनेनंतर संताप व्यक्त होत आहे.