पुणे, १९ एप्रिल २०२५ – पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून महिला नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याविरोधात दाखल असलेले तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर महिलांना लक्ष्य
वारजे परिसरातील महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवरुन वाहनधारकांची व नागरिकांची वर्दळ असते. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी एकट्या-दुकट्या महिला या मार्गावरून जात असताना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून आरोपी पळ काढत होते. अशा स्वरूपाचे गुन्हे वारंवार घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
तपास पथकाची कसून तयारी आणि यशस्वी अंमलबजावणी
या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. मागील दोन आठवड्यांपासून तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, बातमीदारांची माहिती आणि संशयित हालचालींचा बारकाईने अभ्यास केला.
तपासादरम्यान पोलीस अंमलदार निखील तांगडे व अमित शेलार यांना एनडीए ग्राऊंड, वारजे परिसरात संशयितांची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेण्यात आले.
अटक आरोपींची ओळख व जप्त मुद्देमाल
तपासादरम्यान आरोपींनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली:
-
आकाश आंबादास आंधळे, वय २४ वर्षे, रा. दांगट पाटीलनगर, शिवणे
-
सुजल नरेश वाल्मिकी, वय २० वर्षे, रा. दांगट पाटील इस्टेट, दुसरी कमान, शिवणे
आरोपींकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तीन गंभीर गुन्हे उघडकीस
पोलिसांनी पुढील गुन्हे उघडकीस आणले:
-
गुन्हा र.क्र. १०/२०२५ (IPC कलम ३०९(४), ३(५))
-
गुन्हा र.क्र. ९३/२०२५ (IPC कलम ३०९(४), ३(५))
-
गुन्हा र.क्र. १५४/२०२५ (IPC कलम ३०९(४), ३(५))