पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र:
“महाराष्ट्रात राहायचं असेल तर नवीन पिढीला मराठी भाषा आलीच पाहिजे,” असा ठाम आणि मार्मिक सन्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मराठी भाषेचा गौरव करत भाषावादाच्या राजकारणावर सडकून टीका केली.
मराठीचा अभिमान, हिंदीवर टीका नाही – तिन्ही भाषांचे महत्त्व अधोरेखित
अजित पवार म्हणाले, “हिंदी ही राष्ट्रभाषा, इंग्रजी जागतिक भाषा आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे. या तिन्ही भाषा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हिंदीला विरोध करण्याचं काही कारण नाही.”
ते पुढे म्हणाले की, “मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं धाडस केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. त्यामुळे मराठीचा सन्मान राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा.”
नाशिक दंगल प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई – कोणालाही सवलत नाही
नाशिकमध्ये झालेल्या दंगल प्रकरणाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, “कोणताही पक्षीय कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर दोषी म्हणूनच गुन्हा दाखल केला जातो. दोषींवर कठोर आणि योग्य ती कारवाई केली जाईल.”
त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “कोणालाही सोडलं जाणार नाही. कायद्याचे राज्य आणि सामाजिक सलोखा टिकवणं आवश्यक आहे.”
PSI अभिजीत कासले प्रकरणातही निष्पक्ष चौकशी
निलंबित PSI अभिजीत कासले यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना अजित पवार म्हणाले, “संबंधित आरोपांची चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या अहवालानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.”
बीडमध्ये महिलेवरील अत्याचाराविरोधात कडक भूमिका
बीड जिल्ह्यात एका महिलेला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकारावरही अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. “माझ्या निदर्शनास हे फोटो काल रात्री उशिरा आले. हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते. दोषींना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे.”