थेरगाव येथे अन्यायग्रस्त दलित कुटुंबाला अखेर न्याय मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कुटुंबाची तक्रार दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे. कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी या प्रकरणी सत्याग्रह आंदोलन सुरू केले होते. मात्र, पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
थेरगावमध्ये दलित कुटुंबावर अन्याय, प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप
थेरगाव येथील एका दलित कुटुंबावर अन्याय होत असल्याचे उघडकीस आले होते. या कुटुंबाचा पाणीपुरवठा तोडण्यात आला होता, त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. आपल्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कुटुंब मुंबईपर्यंत पायी चालत गेले. ही बाब समजताच कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी या अन्यायाविरोधात सत्याग्रह आंदोलन पुकारले.
पोलीस प्रशासनाची तत्परता, तक्रारीवर होणार कारवाई
बाबा कांबळे यांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालण्याचा निर्णय घेतला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 विशाल गायकवाड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे यांनी मुंबई आझाद मैदान येथे महिला पोलिस अधिकाऱ्यांना पाठवून या कुटुंबाची फिर्याद घेण्यास सहमती दर्शवली. तसेच, या प्रकरणाची चौकशी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांकडून दिलेले आश्वासन, 15 दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
या संपूर्ण प्रकरणात पोलीस आयुक्तालयाने सकारात्मक भूमिका घेतली असून, पुढील 15 दिवसांत योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच, पोलिसांकडून प्रत्येक शनिवारी तक्रारींसाठी जनता दरबार आयोजित केला जाणार असून, त्याची अधिकृत माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
दरम्यान, जर दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी 15 दिवसांत झाली नाही, तर शहरभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला आहे.