नागपूर: नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी भरीव योजना मांडण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनात समतोल, सर्वांगीण आणि विकसित महाराष्ट्राचा आराखडा सादर केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा:
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, १७ महत्त्वाचे विधेयके मंजूर करण्यात आली असून, जनसुरक्षा विधेयकासाठी सर्वांचा अभिप्राय घेण्यासाठी ते संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले आहे.
- ३५,७८८ कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणि माझी लाडकी बहीण योजना यासारख्या योजनांसाठी भरीव निधी वितरित करण्यात आला आहे.
- आपत्ती बाधित संत्रा शेतकऱ्यांना मदत: ५५,००० शेतकऱ्यांना १६५ कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे.
- कापूस व सोयाबीन खरेदी: सोयाबीनची विक्रमी खरेदी केली असून ती १२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा:
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आशियाई विकास बँकेबरोबर करार करण्यात आला असून, ३५८६ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. या निधीमुळे नागपूरच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान:
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, “गेल्या अडीच वर्षांमध्ये आम्ही जनतेच्या हितासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. भविष्यातही आम्ही सर्वसामान्यांच्या हितासाठी एकजूट होऊन काम करू.”
विकासाच्या दिशेने सरकारची पावले:
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बांबू उद्योग, आणि ‘मित्रा’ संस्थेच्या माध्यमातून गावांना जोडण्याच्या उपक्रमांवर भर देण्यात येईल, असे सांगितले.