मुंबईसह महाराष्ट्रात अचानक गारठा वाढल्यामुळे नागरिकांना थंडीचा जोरदार तडाखा बसला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सांताक्रूझ वेधशाळेच्या अहवालानुसार, रविवारी मुंबईचे किमान तापमान १६.३ अंश सेल्सिअस होते, जे हंगामी सरासरीपेक्षा २.२ अंशांनी कमी होते. मात्र, सोमवारी सकाळी ते आणखीन घसरून १४ अंशांवर पोहोचले. गेल्या ४८ तासांमध्ये तापमान तब्बल ६ अंशांनी घसरल्याने हवामानतज्ज्ञांनी ही बदललेली स्थिती “अनपेक्षित” असल्याचे म्हटले आहे.
शनिवारी, १४ डिसेंबरला मुंबईचे रात्रीचे तापमान २०.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते, जे हंगामी सरासरीपेक्षा १.६ अंशांनी जास्त होते. मात्र, त्यानंतर उत्तर दिशेच्या गार वाऱ्यांमुळे तापमान झपाट्याने घसरले. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
हवामानतज्ज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, “आम्ही १६-१८ अंशांदरम्यान तापमान राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, इतक्या तीव्र गारठ्याची अपेक्षा नव्हती. उत्तर दिशा आणि मध्य भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात मोठी घट झाली आहे. १८ डिसेंबरनंतर पुन्हा तापमान वाढ होण्याची शक्यता आहे.”
थंडीचा परिणाम महाराष्ट्रभर:
मुंबईबरोबरच महाराष्ट्रातील इतर भागांतही तापमान मोठ्या प्रमाणावर घटले आहे. अहिल्यानगर येथे ५.५ अंश सेल्सिअस, यवतमाळमधील पुसद येथे ५.६ अंश, सोलापूरच्या मोहोळ येथे ६ अंश, पुण्यात NDA परिसरात ६.१ अंश, पाबळ येथे ६.२ अंश आणि नंदुरबारच्या शहादा येथे ६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
तसेच, पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे ८.३ अंश, राजगुरूनगर येथे ८.५ अंश, बारामती येथे ७ अंश, आणि दौंड येथे ७.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. या आकडेवारीवरून महाराष्ट्रात थंडीचा प्रकोप स्पष्ट होतो.
हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, “हिमालयात होणारा हिमवर्षाव हा उत्तर आणि मध्य भारतात थंडीचा सुरुवात करणारा मुख्य घटक आहे. पश्चिमी अस्थिरतेमुळे थंड वारे हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतांमधून वाहत महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर थंडीची लाट आणत आहेत.”
मुंबईसह राज्यातील नागरिकांनी गरम कपडे आणि आवश्यक तजवीज करून थंडीचा मुकाबला करावा, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.