पुणे, १२ डिसेंबर २०२४:
वडगाव शेरी येथील एका कथित नगरसेवकाने भाजी विक्रेत्या महिलेला फोन करून त्रास देण्याचा आणि विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे महिला घाबरल्याने अखेर चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
प्रकरणाचा तपशील:
फिर्यादी महिला (वय ३०) यांना ८ डिसेंबर रोजी सकाळी ७.१५ वाजता अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला वडगाव शेरीचा नगरसेवक असल्याचे सांगून, “तू मला आवडतेस, तू फक्त हो किंवा नाही बोल, उद्या तुझ्या भाजीच्या दुकानावर येतो,” असे धमकीवजा बोलणे सुरू केले.
त्याने पुढे, “माझ्या आवडत्या व्यक्तीचा नंबर कसा मिळवायचा हे मला माहित आहे, तुला लवकरच समजेल,” असेही म्हणत महिलेला सतत फोन करून त्रास दिला. घाबरलेल्या महिलेने “रॉंग नंबर” असल्याचे सांगितले; मात्र आरोपीने फोन करणं थांबवलं नाही. अखेर दुकानावर येण्याची धमकी मिळाल्याने पीडित महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस तपास सुरू:
चंदननगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीअंती आरोपीचा मोबाईल क्रमांक ट्रेस करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला सुरक्षेचा मुद्दा:
या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.