महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय: नव्या मालमत्तांची नोंदणी व आकारणीसाठी कागदपत्रांची मागणी सुरू
पिंपरी, दि. ५ डिसेंबर २०२४ – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत, आकारणी न झालेल्या मालमत्तांची नोंदणी व कर आकारणी करण्यासाठी व्यापक पाऊल उचलण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत, महानगरपालिकेने मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा. लि. या खासगी कंपनीची नेमणूक केली असून, शहरातील मालमत्तांचे सर्वंकष सर्वेक्षण सुरू आहे.
सर्वेक्षणाचा तपशील:
- आतापर्यंत २,५१,१६५ नव्या मालमत्ता शोधण्यात आल्या असून, त्यापैकी २,०३,८९४ मालमत्तांचे मोजणी कार्य पूर्ण झाले आहे.
- १,१३,८३१ मालमत्ताधारकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नोटीस व एसएमएसद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
मालमत्ताधारकांसाठी आवश्यक कागदपत्रे:
- मालकी हक्काचे पुरावे – खरेदीखत, इंडेक्स २, सातबारा उतारा, मिळकत पत्रिका
- संबंधित संस्थेकडून निर्गमित प्रमाणपत्रे – ताबा पत्र, रजिस्टर अग्रीमेंट
- मालमत्तेचे बक्षीसपत्र किंवा वाटणीपत्र (नोंदणीकृत असल्यास)
- बांधकाम परवानगीचे पुरावे – मंजूर नकाशा व पूर्णत्व प्रमाणपत्र
महापालिकेचे आवाहन:
ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कागदपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांना अंतिम नोटीस बजावण्यात येत आहे. नोटीस बजावल्यानंतरही कागदपत्रांची पूर्तता न केल्यास, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १५० (अ) नुसार मागील सहा वर्षांचे थकीत कर वसूल करण्यात येतील.
सोसायटी अध्यक्ष व सचिवांची जबाबदारी:
ज्या सोसायटींमध्ये फ्लॅटधारक अनुपस्थित आहेत किंवा फ्लॅट भाड्याने दिला आहे, त्या सोसायटींचे अध्यक्ष व सचिवांनी संबंधितांना याबाबत कळवावे आणि त्यांच्या संपर्काची माहिती महानगरपालिकेला द्यावी.
कर विभागाचा संदेश:
“नागरिकांनी आपल्या मालमत्तेची योग्य आकारणी होण्यासाठी ही संधी वापरून कागदपत्रांची पूर्तता करावी. नोटीसवर दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेलद्वारे कागदपत्रे सादर करण्याची सोय उपलब्ध आहे.”
– अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.