महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसला सर्वाधिक जागा देण्यात आल्या आहेत, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
कुणाला किती जागा?
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस जवळपास 100 ते 105 जागांवर निवडणूक लढवणार आहे. उद्धव ठाकरे गटाला 96 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 80 ते 85 जागांवर लढणार असल्याचं समजतंय. या निर्णयामुळे महाविकास आघाडीचा जागावाटप आता जवळपास निश्चित झाला आहे.
तणाव आणि तोडगा
मविआच्या जागावाटपाच्या चर्चेत काही मतदारसंघांवर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, विशेषतः विदर्भातील जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटात संघर्ष दिसून आला. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात वाद झाला होता. मात्र, काँग्रेस हायकमांडने हा वाद सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्यावर जबाबदारी सोपवली आणि अखेर निर्णयासाठी तोडगा निघाला आहे.
पत्रकार परिषदेत घोषणा लवकरच
महाविकास आघाडीची जागावाटपाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आघाडीचं राजकीय समीकरण स्पष्ट होईल.