स्पेसएक्सने रविवार, १३ ऑक्टोबर २०२४ रोजी आपल्या पाचव्या आणि अत्यंत महत्वाकांक्षी स्टारशिप रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले. तब्बल ४०० फूट (१२१ मीटर) उंचीचा हा महाकाय रॉकेट टेक्सासच्या दक्षिणेकडील भागातून सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित करण्यात आला. मेक्सिकोच्या सीमेजवळील टेक्सास राज्यातील तळावरून हे उड्डाण करण्यात आले. विशेष म्हणजे, यावेळी स्पेसएक्सने एक मोठी कामगिरी पार पाडली – रॉकेटच्या बूस्टरला यांत्रिक हातांच्या मदतीने पुन्हा पकडण्यात यश आले.
या प्रक्षेपणाचे सर्वाधिक आकर्षण म्हणजे बूस्टरच्या यशस्वी पुनर्प्राप्तीचा प्रयोग. स्पेसएक्सच्या तंत्रज्ञानामुळे या यशस्वी प्रयत्नामुळे भविष्यातील अंतराळ उड्डाणांच्या खर्चात लक्षणीय बचत होऊ शकते. यापूर्वी चार वेळा प्रक्षेपित करण्यात आलेले स्टारशिप रॉकेट विविध अडचणींमुळे नष्ट झाले होते, काही उड्डाणात ते समुद्रात विखुरले होते तर काही उड्डाणानंतर नष्ट झाले होते. जून २०२४ मध्ये झालेल्या शेवटच्या उड्डाणादरम्यान रॉकेट न फुटता उड्डाण पूर्ण करण्यात यश आले होते.
स्पेसएक्सचा हा नवीन यशस्वी प्रयत्न अंतराळ मोहिमांमध्ये एक मोठे पाऊल मानले जात आहे. ही नवीन तंत्रज्ञान प्रणाली अंतराळ अन्वेषणातील खर्च कमी करणे आणि त्यास अधिक सुलभ बनविणे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.