पुण्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर आज (26 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदी पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मार्गाच्या उद्घाटनासाठी पुण्यात येत आहेत. तसेच स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग आणि पिंपरी-चिंचवड ते निगडी पर्यंतच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजनही करतील.
भारतीय हवामान खात्याने (IMD) गुरुवार आणि शुक्रवारसाठी पुण्यातील जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. विजांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पीएम मोदींच्या भाषणाच्या ठिकाणी, सर परशुरामभाऊ (SP) महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या सभेवर परिणाम होऊ शकतो. या मैदानात पावसामुळे आधीच चिखल झाला आहे, आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो.
या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ म्हणून पाहिला जात आहे.