वाघोली, शिक्रापूर (सचिन धुमाळ), पुणे : पुणे शहरातील वाघोली परिसरात सिमेंट कंक्रीट मिक्सर डंपर आणि शाळेची बस यांचा अपघात घडला. या बसमध्ये १० ते १५ मुलं होती. सुदैवाने या अपघातात कुणालाही इजा झाली नाही, आणि सर्व मुलं सुरक्षित आहेत. या अपघातानंतर लगेचच सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, या दुर्घटनेची गंभीरता दाखवणारे दृश्य स्पष्ट दिसत आहे.
ही दुर्घटना वाघोली-लोहेगाव रस्त्यावर ग्रीन रिपब्लिक सोसायटीसमोर सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथील कोठारी इंटरनॅशनल स्कूलची बस सोसायटीतील मुलांना घेण्यासाठी आली होती. मुलांना घेऊन निघाल्यानंतर सोसायटीच्या बाहेर जात असताना अर्ध्या रस्त्यावर असताना, लोहेगावकडे जाणाऱ्या सिमेंट कंक्रीट डंपरने या बसला धडक दिली. यामध्ये बसच्या समोरील भागावर ट्रकने जोरदार धडक दिली, मात्र सुदैवाने बसमध्ये असलेल्या सर्व मुलं सुरक्षित राहिली.
स्थानिकांची तत्परता आणि पोलिसांची हस्तक्षेप
अपघातानंतर जवळून जाणारी एक स्थानिक बस लगेचच घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी लगेच मुलांची विचारपूस केली. सर्व मुलं सुरक्षित असल्याचं लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना तात्काळ फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या १०० क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी या अपघाताबद्दलची माहिती दिली. या घटनेनंतर लोणीकंद वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली आणि सोसायटीतील सदस्यांसोबत संवाद साधला.
अपघाताची तीव्रता आणि दोन्ही चालकांवर कारवाईची मागणी
या अपघातात बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असले तरी, सर्व मुलं आणि कर्मचारी सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, अपघातानंतर सोसायटीतील नागरिकांनी दोन्ही वाहन चालकांच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी वाहतूक विभागाकडे या निष्काळजी चालकांवर कठोर कारवाईची मागणी केली. जाधव यांनी अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
वाहनचालकांची निष्काळजीपणा आणि वाहतूक सुरक्षेचे आव्हान
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या अपघातांमध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अपघातानंतर मुलांची सुरक्षितता आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वाढती वाहतूक समस्या आणि अपघातांचे वाढते प्रमाण
वाघोली परिसरात सतत वाढणारी वाहतूक आणि अवजड वाहनांच्या धावण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले. या अपघातामुळे परिसरातील रहिवाशांनी मुलांच्या सुरक्षिततेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.