पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरातील फिनिक्स मॉलबाहेर मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने हवेतील गोळीबार केल्याची घटना घडली आहे. फिनिक्स मॉल हा या परिसरातील सर्वात मोठा मॉल म्हणून ओळखला जातो, आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिस नियंत्रण कक्षाला एका प्रत्यक्षदर्शीने फोनवरून या घटनेची माहिती दिली. त्या नंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे, ज्यात आरोपी व्यक्ती पिस्तूल काढून फिनिक्स मॉलच्या दिशेने हवेत गोळीबार करताना दिसतो. त्यानंतर लगेचच तो पळून जातो. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या घटनेबद्दल नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी ही घटना घडल्याने पोलिसांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड परिसरात काही दिवसांपूर्वीच माजी नगरसेवकाच्या गोळीबाराची घटना घडली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तातडीने कारवाई करत वाकड पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला पकडले असून, त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
या प्रकारामुळे मॉल आणि परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिस तपासात हवेतील गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.