मावळ/कामशेत: गणपती विसर्जनावेळी कामशेत बेडसे येथे बाप-लेकाचा अनधिकृत खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. गुरुवारी (१२ सप्टेंबर) संध्याकाळी ही घटना घडली.
संजय धोंडू शिर्के आणि आदित्य संजय शिर्के (दोघेही बेडसे, ता. मावळ) हे बुडून मृत्यू पावलेल्या बाप-लेकाचे नाव आहे. वन्यजीव रक्षक आणि आपत्ती मित्र मावळ यांच्या मदतीने या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील गणपती विसर्जनावेळी गावकऱ्यांनी भक्तिभावाने गणपती बाप्पाला निरोप दिला. मात्र, शिर्के कुटुंबीयांनी घराजवळील अनधिकृत खाणीत साचलेल्या पाण्यात गणपतीचे विसर्जन केले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने हा दुर्दैवी अपघात झाला. आनंदी वातावरणात या अपघाताने संपूर्ण गावात शोकाचे वातावरण पसरले. आदित्य शिर्के विसर्जनासाठी पाण्यात उतरला, पण त्याला बराच वेळ पाण्यातून बाहेर येत नसल्याचे पाहून त्याचे वडील संजय शिर्के पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा खोलपणा अधिक असल्याने आणि त्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही मृत्यू झाला.
या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत असून, अनधिकृत खाणमालकावर कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.