तिरुपती: तिरुमला बालाजी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या पुण्याच्या कुटुंबाने सुमारे २५ किलो वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांनी सजलेल्या त्यांच्या आगळ्यावेगळ्या दर्शनाने अनेकांचे लक्ष वेधले. शुक्रवारी सकाळी पुण्याचे ‘गोल्डन बॉईज’ म्हणून ओळखले जाणारे सनी वाघचौरे आणि संजय गुजर यांनी तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेतले.
हे दोघे त्यांच्या चमकदार आणि जड सोन्याच्या दागिन्यांसह मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांनी घातलेल्या सोन्याच्या जड साखळ्या, अंगठ्या इत्यादींची चांगलीच चर्चा झाली. मंदिरातून दर्शन संपवून बाहेर पडल्यावर भक्तांनी त्यांना घेरून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक आणि तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) सुरक्षा रक्षक यांना गोंधळ शांत करण्यासाठी धावपळ करावी लागली.
सनी नानासाहेब वाघचौरे हे पुण्यातील व्यवसायिक असून फिल्म फाइनान्सर आहेत, तर संजय गुजर हेही फिल्म फाइनान्सर असून इन्फ्रा आणि रिअल इस्टेट व्यवसायात आहेत. पुण्यातील या दोघांचा सोन्याबद्दलचा प्रेम जगजाहीर असून, हे नेहमीच सोनेरी पादत्राणे, हिरेजडित आणि सोन्याच्या काठाने सजवलेले मोबाईल फोन वापरतात आणि सोनेरी पेंट केलेल्या लक्झरी गाड्यांमध्ये फिरतात.