भोसरी येथे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तींवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून या दोघांना गंभीर जखमी केले. हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मुख्य आरोपी व त्याचा साथीदार गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर, एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुरोज प्रकाश रणदिवे (वय ३०, रा. घरकुल चिखली), अथर्व उदय पक्कले (वय २०, भोसरी), प्रतीक ज्ञानेश्वर सापकाळ (वय २८, वाकड), चेप्या उर्फ केतन गौतम सोनवणे (वय २६, मिलिंदनगर) आणि लकी उर्फ लखन उर्फ सुनील रामभाऊ पवार (वय २४, कलाखडक झोपडपट्टी) अशी आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, २० जून रोजी एमआयडीसी भोसरी येथे फैज फहीम शेख व त्याचा मित्र विशाल गौतम दुचाकीवरून घरी जात असताना, आरोपी अथर्व पक्कले व त्याचे दोन साथीदार दुचाकीवरून आले आणि त्यांनी फैज शेख यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या सुरोज रणदिवे व त्याच्या दोन साथीदारांनी फैज शेख यांच्यावर “पैसे मागून त्रास देतोस का?” असे ओरडत लोखंडी रॉडने हल्ला केला व त्यांना गंभीर जखमी केले. जुना वाद उकरून काढत लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. फैज शेख यांच्या मित्रावरही हल्ला करण्यात आला आणि त्यांना देखील जखमी करण्यात आले. या घटनेनंतर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात आधीच विवेक विनोद नाईक उर्फ सोन्या (वय २०, खांडेवस्ती, भोसरी) आणि सौरभ कनीफनाथ भोपळे (वय २०, रा. भोसरी) यांना अटक करण्यात आली होती, तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले होते. परंतु मुख्य आरोपी सुरोज रणदिवे आणि त्याचे साथीदार फरार होते. सुरोजवर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण हद्दीत गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तांत्रिक तपास करून सुरोज आणि त्याच्या साथीदारांना अटक केली.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, संयुक्त पोलिस आयुक्त शशिकांत महावारकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पानसरे, तसेच पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत गवारी, शरद गांधी, राजू जाधव, संयज जारे, स्वप्निल शेलार, गणेश बोरहाडे, राहुल लोखंडे, जीवन बिराजदार, प्रवीण मुलूक, नितीन खैसे, विशाल काळे, भागवत शेप, आनंद जाधव, अक्षय क्षीरसागर, अनिकेत कांबळे यांनी केली.