पुणे-सोलापूर महामार्गावरील एका लग्न हॉलजवळ उभारलेले एक विशाल होर्डिंग शनिवारी दुपारी ४.३० वाजता अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे कोसळले. हा प्रकार हडपसर तालुक्यातील कडमवाकवस्तीच्या हद्दीत कवडिपाट टोल नाक्याजवळील गुलमोहर लॉन्स येथे घडला. या घटनेत दोन व्यक्ती जखमी झाले असून, एका घोड्याला किरकोळ इजा झाली आहे. काही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्सचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील गुलमोहर लॉन्स येथे शनिवारी ४:३० वाजता अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे ३५ ते ४० फूट उंचीचे एक विशाल होर्डिंग कोसळले. या घटनेत येरवड्याचे रहिवासी भरत साबळे (वय ५७) आणि पुण्याचे अक्षय कोरवी (वय २७) हे दोन जण जखमी झाले. लग्न सोहळ्यासाठी पुण्याच्या बँडला बोलावण्यात आले होते आणि घोड्याची गाडी झाडाला बांधण्यात आली होती. होर्डिंग कोसळल्यानंतर नागरिकांनी दोघांनाही तातडीने वाचवून रुग्णालयात दाखल केले, आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. घोड्यालाही किरकोळ इजा झाली.
या घटनेनंतर लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे हवालदार रामदास मेमाणे आणि पोलीस अजींक्य जोजारे घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरु केला. पुणे-सोलापूर महामार्गावर अनेक अनधिकृत होर्डिंग्ज आणि फ्लेक्स उभारण्यात आले आहेत, जे प्रवाशांसाठी धोका निर्माण करीत आहेत. मागील वर्षी मे महिन्यात कडमवाकवस्ती येथे अनधिकृत होर्डिंग बदलताना दोन युवकांना विजेचा धक्का बसला होता. सुदैवाने, त्यांना तातडीने उपचार मिळाले आणि ते वाचले. या घटनेमुळे अनधिकृत होर्डिंग्जमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. आता गुलमोहर लॉन्समध्ये होर्डिंग कोसळून दोन जण जखमी झाल्यानंतर स्थानिक लोक प्रशासनाने मोठा अपघात होण्याआधी काही उपाययोजना करणार का, याबाबत चिंता व्यक्त करत आहेत.