बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) सध्या तिच्या व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या 77 व्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये (Cannes Film Festival 2024) सहभागी झाली होती. कान्समधील ऐश्वर्याचे दोन दिवसातील लूक समोर आले आहेत आणि तिचे दोन्ही लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. मात्र, चाहत्यांना तिच्या हाताला झालेल्या दुखापतीने आश्चर्यचकित केले आहे. ऐश्वर्या आता भारतात परतली आहे, आणि एअरपोर्टवर तिच्या हातावरचं प्लास्टर पाहून पापराझींनी तिला प्रश्न विचारले. नवीन माहितीनुसार, ऐश्वर्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, एक आठवड्याआधी ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली आहे. हाताला फ्रॅक्चर असूनही ऐश्वर्याने ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला जाणं सोडलं नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही ती कान्समध्ये सहभागी झाली होती. सूत्राने पुढे सांगितले की, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) स्पेशलिस्ट आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कान्सला गेली होती. भारतात परतल्यानंतर लगेचच ती आपली शस्त्रक्रिया करणार आहे. तिच्या हाताला दुखापत कशामुळे झाली हे अद्याप समोर आलेले नाही. शस्त्रक्रिया या आठवड्याच्या शेवटी होणार आहे.
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024’मध्ये ऐश्वर्याचा जलवा पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी तिने काळ्या-पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता आणि दुसऱ्या दिवशी निळा, हिरवा आणि सिल्वर रंगाचा टिनसेल गाऊन परिधान केला होता. तिचे दोन्ही लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरले. कान्समध्ये तिने लाडकी लेक आराध्या बच्चनसोबत हजेरी लावली होती.