पुष्पा आणि ॲनिमल सारख्या चित्रपटांमुळे देशभर प्रसिद्ध झालेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हणतात. काही दिवसांपूर्वी रश्मिकाने मुंबईतील अटल सेतूचे कौतुक करणारा एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यात तिने पुलाचे आणि त्याला बांधणाऱ्या सरकारचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रश्मिकाचा हा व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. मात्र, आता रश्मिका मंदानावर जोरदार टीका होत आहे. काही लोक म्हणत आहेत की, नॅशनल क्रश ही नॅशनलिस्टही आहे, तर केरळ काँग्रेसने हा व्हिडिओ ईडीने दिग्दर्शित केलेली जाहिरात असल्याचे म्हटले आहे.
केरळ काँग्रेसने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे, “प्रिय रश्मिका मंदानाजी, देशाने यापूर्वी पैसे देऊन केलेल्या छुप्या आणि खोट्या जाहिराती पाहिल्या आहेत, पण ईडीने दिग्दर्शित केलेली ही पहिलीच जाहिरात आहे. जाहिरात चांगली झाली आहे, अभिनंदन. मात्र, तुमच्या जाहिरातीत अटल सेतू पूर्ण रिकामा दिसत आहे. त्यामुळे आम्ही मुंबईतील काँग्रेस सहकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, अटल सेतूपेक्षा राजीव गांधी वांद्रे-वरळी सी लिंकवर अधिक वाहतूक असते.” यासोबतच, केरळ काँग्रेसने वांद्रे-वरळी सी लिंकवरील अधिक वाहतूक दाखवणारा एक व्हिडिओही शेअर केला आहे.