पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पैशांचे वाटप झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला. या प्रकरणी पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष संदीप गुजर आणि युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तसेच या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीका केली आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी बारामती येथे आमदार रोहित पवार हे मतदान करण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, “मतदानाच्या अगोदरच्या दिवशी सर्व ठिकाणी धनशक्तीचा वापर झाला. भोरमध्ये जी गाडी फोडली त्यात पैसे सापडले. बारामतीत कधीही पैसे वाटले गेले नाहीत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैशांचा वाटप करण्यात आले, खर तर ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनाधक्ती अशीच म्हणावी लागेल. पैशांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र अनेक ठिकाणी नागरिकांनी पैसे नाकारले. सर्व सामान्य नागरिकांसाठी पुणे जिल्हा बँक ही ५ वाजता बंद होते. मात्र यांच्यासाठी रात्री एक एक वाजेपर्यंत सुरू राहते. तसेच कर्मचारी देखील यात सहभाग घेतात. हे खूप वाईट आहे. त्यामुळे यंदाची बारामतीची लढाई ही जनशक्ती विरूद्ध धनशक्ती अशीच होणार आहे.