बांबू, बॅट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चौघांनी मिळून एका तरुणाचा खून केला. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी आकुर्डी, पंचतारानगर पांढरकर वस्ती येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
अली सय्यद (वय २०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नौशाद हकीबुल्ला साह (वय २१), मोहम्मद मुबीन हकीबुल्ला साह (वय १८), शमीम हकीबुल्ला साह ऊर्फ पुल्ल (वय २७), सुजित सुभाष पाल (१८, सर्व रा. आकुर्डी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी १७ वर्षीय मुलाने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी मुलाचे आरोपी नौशाद याच्याशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्या वेळी मित्रांनी भांडण सोडवले. त्यानंतर तासाभराने आरोपी फिर्यादी याच्याकडे आले. फिर्यादी याला मारहाण करून आरोपींनी पळ काढला. याबाबत फिर्यादीने मित्र अली सय्यद यास सांगितले.
या भांडणाचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आणि त्याचा मित्र अली सय्यद हे आरोपींकडे गेले. त्यावेळी आरोपींनी अली सय्यद याच्या डोक्यात लाकडी बॅट, दांडक्याने मारहाण केली. तसेच, फिर्यादी यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. यामध्ये अली गंभीर जखमी झाला. दोघांना पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. फिर्यादी मुलगा उपचार घेऊन घरी आला. मात्र, अली सय्यद हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारी (दि.२७) त्याचा मृत्यू झाला आहे.